पूर्वी लोकांचा जीवनक्रम नदीवर अवलंबून असे, म्हणून वस्त्याही नदीजवळ पुरापासून सुरक्षित जागी असत. नावघाटावर उतरले की होळी. ही ब्राह्यणांची वस्ती म्हणजे नांदेडची सदाशिव पेठ! पूर्वापार सारं राजकारण होळीवरुनच चाले. होळी आणि सराफा, मारवाडगल्ली हे एक युनिट समजल्यास हैद्राबाद मुक्ती संग्रामातील इतिहास इथेच घडला. श्यामराव बोधनकर, भगवानराव गांजवे, गोपाळशास्त्री देव, विनायकराव डोईफोडे, सरस्वतीबाई सरदेशपांडे, शकुंतलाबाई साल्ये, कावेरीबाई बोधनकर, ताराबाई परांजपे हे स्वातंत्र्यवीर होळीवरचेच.
निजाम राज्यात मराठवाड्यात औरंगाबाद आणि नांदेड हीच दोन शहरे गणली जात. इथे लाइट होती. नळाचे पाणी होते. लातूर, परभणीला या सोयी अॅक्शननंतर १९६० साली आल्या. नांदेड हे मराठवाड्यातील ऐकमेव औद्योगिक शहर! उस्मानशाही मिल्सचे कापड परदेशात जात असे. १९५० मध्ये मराठवाड्यात सर्व प्रथम कॉलेज स्थापन झाले ते नांदेड आणि औरंगाबादला. म्हणून ही दोन शहरे उच्च शिक्षणाच्या गंगोत्री, जन्मोत्री आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० जून १९५० रोजी औरंगाबादेत मिलींद महाविद्यालय सुरु केलं. त्याच तारखेला स्वामी रामानंद तीर्थ यांनी नांदेडला पीपल्स कॉलेज सुरु केलं. त्यामुळेच पुढे चालून औरंगाबादच्या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव तर नांदेडच्या विद्यापीठाला स्वामी रामनंद तीर्थ यांचं नाव देण्यात आलं.
कॉलेजच्या निमित्तानं नांदेडची रयाच पालटली. ज्येष्ठ गांधीवादी नेते दादासाहेब बारलिंगे यांचे बंधू सुरेंद्र बारलिंगे, कुसुमाग्रजांचे बंधू के. रं. शिरवाडकर, ज्येष्ठ समीक्षक प्रा. स. रा. गाडगीळ, राम शेवाळकर, नरहर कुरुंदकर इत्यादी उत्तुंग व्यक्तिमत्वे लाभले हे नांदेडचं भाग्य! यांच्यासहित म. म. यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, इतिहास संशोधक तात्यासाहेब कानोले, संगीताचार्य अ. ह. गुंजकर, चित्र महर्षी त्र्यं. शां. वसेकर, रसिकाग्रणी अण्णासाहेब अंबेकर, नास्तिकाचार्य ग. धों. देशपांडे गुरुजी, हे एकत्र बसले म्हणजे काव्यशास्त्र विनोदाला भर येत असे. १९५५ ते १९६५ चे दशक म्हणजे नांदेडचा सुवर्णकाळ म्हटला जातो. ग. धों. गुरुजी यज्ञेश्वर शास्त्रीच्या घरी राहत. शास्त्रीबुवा पूजेला बसले की हे नास्तिकाचार्य शेजारी पाट टाकून हे कर्मकांड कसं थोतांड आहे हे सांगत. पूजा आटोपल्यावर शास्त्रीबुवा देवाला नमस्कार करुन चला आता जेवायला, उरलेला उपदेश जेवताजेवता ऐकतोअसं हसून म्हणत. त्याकाळी कुठे ना कुठे व्याख्यानं असेच. वक्ते हेच कधी यज्ञेश्वर शास्त्री पूर्वरंग करीत तर उतररंग करण्यास कुरुंदकर गुरुजी, गाडगीळांच्या जडजंबाल भाषणाला शेवाळकरांच्या नर्म विनोदाचा शिडकावा असे.
नांदेड हे पूर्वीपासून व्यापारी गाव, नांदेड ही लक्ष्मी पुत्रांची पेठ, कापूस, भुईमुगाचा जबर व्यवसाय. इथे शेकडो वर्षांपासून हातमागाचा व्यवसाय होता. मुसलमान मोमीन, तेलगू पद्मशाली आणि मराठी शाळू (विणकर) या धंद्यात होते. पद्मशाली आणि व्यापारी कोमटी आर्यवैश्य मूळचे तेलगू भाषिक, आता ते शंभर टक्के मराठी झाले आहेत.