भौगोलिक माहिती
नांदेड जिल्हा उत्तर अक्षांश १८० १६’ ते १९० ५५’ व पूर्व रेखांश ७६० ५५’ ते ७८०१९’ या दरम्यान पसरलेला आहे. तो भौगोलिकदृष्ट्या खंडांतर्गत स्थितीनुसार महाराष्ट्र राज्याच्या मध्यपूर्व भागात, अरबी सागर व बंगालच्या खाडीपासून दूर व भारत भूखंडाच्या मध्यांतर्गत भागात वसलेला आहे.
प्राकृतिक पर्यावरण
नांदेड हे गोदावरीच्या नाभिस्थान वसलेले शहर आहे. नदीच्या खोऱ्याचा भाग हा सपाट मैदानाचा आहे. गोदावरीच्या खोऱ्यात असलेली बहुतेक जमीन काळी सुपीक व ठिसूळ आहे. नांदेड शहर परिसरातील भूस्वरुपाची विभागणी १. टेकड्या, २. सपाट पठाराचा भूभाग, ३. नदीकाठच्या तटीय प्रदेश या प्रकारात झालेली आढळून येते. केवळ शहर परिसरच नसून एकंदर जिल्ह्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत टेकड्यांचे क्षेत्रफळाची टक्केवारी १.३६% तर सपाट पठाराच्या क्षेत्रफळाची टक्केवारी ७७.६० इतकी आहे आणि पूर मैदान/ नदी काठच्या तटीय प्रदेशाच्या क्षेत्रफळाची टक्केवारी २०.८३ आहे. यावरून नांदेड परीसारातही टेकड्यांचे प्रमाण अत्याल्प आहे तर बहुतांश भूभाग पठारांनी व्यापलेला आहे. त्याखालोखाल प्रमाण नदीच्या तटीय प्रदेशातील काळ्या व सुपीक मातीच्या भूभागाची आहे. विविध भूरुपीय प्रक्रियांचा प्रदेशाच्या ठेवणीवर परिणाम होतो. नांदेड जिल्हा दख्खनच्या पठारावर वसलेला आहे. येथील प्रदेश हा जवळपास सपाट मैदानी प्रदेशांतर्गत जरी मोडत असला तरी डोंगराळ भाग सुद्धा येथे आढळून येतो. प्राकृतिकरित्या जिल्हा तीन घटकात विभागला आहे. उत्तरेकडील डोंगराळ प्रदेश :- सातमाळा व निर्मल या डोंगराच्या रांगा या भागात येतात. उत्तरेकडील भोकर, हिमायतनगर, हदगाव, माहूर व किनवट तालुक्यांचा बहुतांश भाग या विभागात येतो. मध्यभागातील गोदावरी खोऱ्यांचा भाग :- दक्षीणेकडील गंगा म्हणून प्रसिद्ध असलेली गोदावरी नदी हि उत्तरेकडील व दक्षिणेकडील डोंगराळ भागांच्या मधल्या भागातून वाहते. नांदेड, धर्माबाद, लोहा, नायगाव, बिलोली, आणि देगलूर हा प्रदेश गोदावरी नदीमुळे कृषीसमृद्ध झाला आहे व येथील जमीन सुपीक आहे. दक्षिणेकडील डोंगराळ भाग :- दक्षिणेकडील मुखेड व कंधार तालुका हे प्रामुख्याने या विभागात येतात. या शिवाय देगलूर तालुक्याच्या दक्षिणेकडील भागाचाही समवेश यात होतो. जिल्ह्यात आढळून येणाऱ्या डोंगरांच्या रांगा याप्रमुख्याने वायव्य, आग्नेय, या दोषेला एकमेकांना समांतर पसरलेल्या आहेत.
भूजल
भूजल उपलब्धीच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील भूस्तरीय रचना महत्वाची ठरते. जिल्ह्यातील भूस्तरीय रचनेचे स्थूलमानाने तीन विभाग करता येतील. (१)आर्कीयन-ग्रेनाईट, (२)क्रितेशिअस ते इओसिन-बेसाल्ट आणि इंटर ट्रेपिअन बैडस,(३)रीसेर्ट-अल्युव्हीयल. यापैकी पहिल्या विभागातील खडक बिलोली आणि देगलूर तालुक्याच्या दक्षिण आणि पूर्व भागात तसेच किनवट शहराच्या उत्तर व दक्षिणेस पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर पसरलेला आहे. ग्रेनाईट ह्या खडकामध्ये जास्त विघटन झालेल्या स्तरामध्ये पाणी आढळून येते. ह्या खडकामध्ये व्हेदरिंग १४ ते ३० मीटरपर्यंत आहे. ग्रेनाईट असल्यामुळे पाणी लागत नाही आणि आवेधनाचे काम होऊ शकत नाही. या भागातील विंधन विहीरीची क्षमता ४,000 लिटर्स ते १५,000 लिटर्स प्रती तास आढळून येते. पाण्याची स्थिर पातळी ५ मीटरपासून १५ मीटरपर्यंत आहे. विंधन विहिरीच्या यशस्वीतेचे प्रमाण ८५% ते ९०% आहे.